मंडळी ह्यावर्षीच्या मार्च पासून ऑगस्ट पर्यंत, गेली सहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठेच बाहेर फिरायला जाता येत नसल्याची खंत मनात होती. मुलीच्या शाळेची दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टीसुद्धा कधी नव्हे ती घरी बसूनच काढली आणि आता शाळा सुरू होण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. अशा काहीशा मरगळलेल्या परिस्थितीत अबुधाबीजवळच्या वाळवंटातील oasis ला भेट देण्याचा योग जुळून आला आणि जणू काही अत्यंत गरम, उष्म वातावरणात, अंगाची लाहीलाही होत असताना, एक थंड हवेची झुळूक यावी व मन प्रसन्न व्हावे असे झाले अणि कोरोनाच्या परिस्थितीशी दोन हात करण्याची ऊर्जाच जणू मिळाली. कारण सुट्टीच्या दिवशी इच्छा असूनही बाहेर न जाता, घरी बसून वेळ घालवणे हे परिस्थितीशी दोन हात करण्यासारखेच आहे. नाही का!तर असो..
वाळवंटातील oasis ही संकल्पना अगदी लहानपणापासून भूगोलाच्या अभ्यासक्रमात अभ्यासली गेली होती आणि आता प्रत्यक्षात अनुभवायचा योग जुळून आला. जसं आपण म्हणतो जिथे समुद्र आणि आकाश मिळते ते क्षितिज तसेच जिथे नजर जाईल तिथपर्यंत वाळू असणाऱ्या वाळवंटात पाण्याची तळी असतात त्यांना oasis म्हणतात. असेच एक ठिकाण आहे अबुधाबीपासून एक तासाच्या अंतरावर ..Al Wathba याठिकाणी..
संध्याकाळी साधारणतः पाचच्या सुमारास, वाळवंटातील रस्त्यातून (पक्के डांबरी रस्ते) वाट काढत, आजुबाजूला फिरणाऱ्या उंटाचे दर्शन घेत, आम्ही या जलाशयाशी पोहोचलो. आयुष्यात प्रथमच वाळवंटात एवढी मोठी पाण्याची तळी पाहून मुलांनी मोठ्याने हुर्यो केला. स्वच्छ अशा निळसर हिरव्या पाण्यात पाय बुडवताच दिसू लागले ते छोटे छोटे भरपूर असे रंगबिरंगी मासे.
वाळवंट, त्यात पाणी आणि त्यात छोटे छोटे विविध रंगाचे आपल्याच मस्तीत खेळणारे मासे पाहून सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.
तलावाकाठी, झाडाच्या सावलीत मस्त चटया टाकून बसलो. लहानपणी आई-बाबांबरोबर रंकाळ्यावर फिरायला गेल्याची आठवण झाली आणि त्याचबरोबर आठवली तिथली स्वादिष्ट भेळ..
नवर्याच्या मनातले विचार ओळखू शकणार नाही ती बायको कसली, आमच्या मनातले विचार पण महिला मंडळाने पक्के ओळखले आणि बेत जमला फक्कड भेळीचा.. बघता-बघता सूर्यास्ताची वेळ जवळ येऊन ठेपली आणि मुलांचे लक्ष गेले वाळवंटातील डोंगरांवर ते म्हणजे sand dunes वर… मग काय वाळूमध्ये लहानशा डोंगरावर चढून घसरगुंडी करत खाली येण्याचा खेळ सुरू झाला.
वाळूचे डोंगर, शेजारी तलाव व आजूबाजूला हिरवी झाडी, असा मस्त त्रिवेणी संगम या वाळवंटात जुळून आला होता.
एकमेकांशी गप्पा मारत, तळ्याकाठी मस्तपैकी मसाला चहाचा आस्वाद घेत, अंधार कधी झाला आणि मस्त चांदणे कधी पडले हे समजलेच नाही. अशा भारावलेल्या वातावरणात, मनात असंख्य आठवणी साठवत, परत एक रम्य संध्याकाळ इथे घालवण्याचा विचार करत आमची गाडी परतीच्या मार्गावर लागली.
छान अनुभव. नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नवीन नवीन ठिकाणे शोधून काढण्यात तुमचा हातखंडा आहे.
LikeLike
Mast 👍👏👌
LikeLike
Thank you.
LikeLike
Mastaa jaaga ani lekh.
Rankalayacha ullekh vachun Raja Bhau chi bhel athavali
LikeLike